97632 06212 pwatsaru@yahoo.com

मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावाच...


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘मुसलमानांचा मताधिकार काढून घ्यावा.’ अशी मागणी दैनिक सामनामधून केली आणि त्याचे पडसाद देशभर गेले दोन दिवस उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनाच नव्हे, तर देशातील सर्वच जनसामान्यांना ही गोष्ट बर्यािपैकी माहीत आहे, की ह्या देशाच्या राजकारभार एका संविधानाच्या आधारे चालत असल्यामुळे देशाच्या कोणत्याही नागरिकाचा अगदी काश्मीर खोर्यासतील किंवा उत्तरपूर्वेकडील राज्यातील कोणत्याही फुटिरतावादी व्यक्तीचा देशातील मताधिकार काढून टाकणे शक्य नाही. तरीदेखील गेले दोन दिवस याच विषयावर सतत चर्चा चालू आहे. खासदार संजय राऊत कोणी खूप विद्वान व्यक्ती आहेत आणि ते फार विचारपूर्वक विधाने करतात असेही नाही. आज देशात योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड/नियुक्तीची परंपराच संपलेली असल्यामुळे कोणीही संजय राऊत एखाद्या दैनिकाचा संपादक होऊ शकतो, खासदार निवडला जाऊ शकतो आणि वाटेल तशी विधानेही बिनधास्त करू शकतो. कारण आपल्या देशात कायद्याची अंमलबजावणीदेखील व्यक्ती आणि परिस्थिती पाहून केली जाते, निव्वळ कायदा म्हणून केली जात नाही. तसेच आज काल टीव्ही चॅनल्सना सुकाळ म्हणण्यापेक्षा अक्षरशः ऊत आला असल्यामुळे कोणाच्याही भंपक नव्हे, बालिश विधानावरदेखील आठ आठ दिवस चर्चेचा कीस पाडला जाऊ शकतो.