97632 06212 pwatsaru@yahoo.com

एका अस्वस्थतेची अखेर


२४ डिसेंबर २००९ ला भास्कर भोळे गेले. भोळ्यांच्या आठवणी व अस्तित्वाच्या खाणाखुणा अवतीभवती अजून रेंगाळत असताना व त्यांचे अप्रकाशित लेखनप्रकल्प पूर्ण करत असतानाचा डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरेचा खून झाला. ११ एप्रिल २०१५ ला यशवंत सुमंत गेले. सुमंतांआधी त्यांचे पूर्वसुरी कॉ. शरद पाटील गेले. सुमंतांचे व आम्हा सर्वांचे गुरू राम बापट ही जाऊन २ वर्षे होताहेत. याच काळात गो. पु. देशपांडेही गेले. पुरोगामी विचारधारेतील ही सारी माणसे आजघडीला आपल्याबरोबर नसणे हे स्वीकारणे अटळ असले तरी अवघड आहे. सुमंतांच्या बाबतीत तर हे विशेष अवघड आहे. एकत्रित केलेले प्रवास, व्याख्यानदौरे, शिबिरे प्रदीर्घ चर्चा व एकत्रित करावयाच्या ठरलेल्या भविष्यातील अनेक गोष्टी यातून सुमंतांपासून स्वतःला वेगळे करणे अवघड आहे. पुरोगामी चळवळीसाठी अत्यंत कठीण असलेल्या काळात सुमंतांचे नसणे ही खरोखरच न भरून येणारी पोकळी आहे.