97632 06212 pwatsaru@yahoo.com

आठवणीतील सुमंत सर


महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत यशवंत सुमंत यांचे शनिवार दि. ११ एप्रिल २०१५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक आणि साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. राज्यशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख ही जरी प्राधान्याने ओळख असली तरी त्यांची नाळ सामाजिक शास्त्रे, साहित्य, वेगवेगळ्या संघटना, चळवळी, वैचारिक व्यासपीठे आणि संस्थाशी जुळलेली होती. आधुनिक भारतीय राजकीय विचार, एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील धर्मचिंतन, महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक वास्तव व राजकीय विचार आधुनिक राजकीय विचारप्रणाली राजकीय सिद्धांत आणि तुलनात्मक राज्यशास्त्र हे त्यांच्या चिंतनाचे प्रमुख विषय होते. महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स, विनोबा, आचार्य जावडेकर व वि. रा. शिंदे यांचे विचार ते मानत होते. समाजव्यवस्था शोषणमुक्त असावी हा त्यांचा विशेष आग्रह असायचा, म्हणजेच जातिमुक्त, वर्गविरहीत आणि लिंगभावात्मक आधारित भेदभावमुक्त व्यवस्था असावी असे त्यांचे मत होते. कोणत्याही प्रश्नाकडे तुकड्यातुकड्यात न बघता समग्र पद्धतीने बघण्याची त्यांची दृष्टी होती. सरांच्या सहवासात विद्यार्थी म्हणून आलेला सरांशी संपर्क, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि सार्वजनिक जीवनाचा जो अनुभव आला, त्यातील निवडक आठवणी व कार्य सांगता येईल.