97632 06212 pwatsaru@yahoo.com

काश्मीरची गाथा


काश्मीरच्या दीर्घकाळ चिघळलेल्या प्रश्नाला अनेक परस्परसंबंधित पण स्वतंत्र परिमाणे आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांतील एक वादग्रस्त प्रदेश या स्वरूपात या समस्येकडे बघितले जाते. तसेच तो सीमेवरील मुस्लीमबहुल प्रदेशाने हिंदूबहुल भारतात सामील होण्याच्या पक्षी एक हिंदू-मुसलमान प्रश्नही मानला जातो. भारत-पाकिस्तानमधील एका 1971 मधील युद्धाचा अपवाद वगळला तर इतर वेळी संघर्षाचे कारण काश्मीरबाबतचा वाद हेच होते. 1989-90 सालापासून हिंसाचार आणि दहशतवादी संघटनांचे प्राबल्य वाढल्याने या समस्येला नेहमीच असलेले आंतरराष्ट्रीय परिमाण अधोरेखित झाले. या सर्व संघर्षाचा थेट परिणाम स्थानिक जनतेस सहन करावा लागतो. दहशतवादी आणि सैन्य यांच्यातील संघर्षाची प्रत्यक्ष झळ सोसावी लागते त्या काश्मिरी जनतेस या संघर्षाबाबत काय वाटते याकडे सहसा लक्ष जात नाही. काश्मीर प्रश्नाच्या विविध बाबीवर आता नवीन काय सांगता येईल असा प्रश्न कोणाच्या मनात उमटला तर या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य हे की पुस्तकाशी संबंधित लोक जम्मू काश्मीरशी संबंधित असून तिथला स्थानिक दृष्टिकोन यात प्रतिबिंबित होतो हे आहे. पुस्तकाच्या संपादिका सध्या अमेरिकन विद्यापीठात शिकवत असल्या तरी त्या मूळ काश्मिरी आहेत. त्याचप्रमाणे या पुस्तकातील निबंधलेखक काश्मिरी असून त्यातील अनेकजण जम्मू काश्मीर राज्यातील विद्यापीठे आणि संशोधन संस्थात काम करतात तर कांही त्या राज्याबाहेरील विद्यापीठांशी संबंधित आहेत. त्यामुळे पुस्तकातील विवेचन प्रामुख्याने काश्मिरी बुद्धिवादी लोकांचा आवाज गठित करते. या पुस्तकाच्या शीर्षकातून (जुन्या काळी लिहिण्यास वापरलेले चिवट माध्यम/कागद/भूर्जपत्र) या पुस्तकातील विवेचन एका मोठ्या कालखंडाचा विचार करते असे जे सूचन होते ते यथार्थ आहे. इतिहास, संस्कृती आणि राज्यव्यवस्था अशा तिहेरी अंगाने केलेल्या विवेचनाने या प्रश्नातील गुंतागुंत वाचकांपर्यंत या पुस्तकातील विविध लेखांतून पोचवली जाते. या बहुतेक लेखकांनी काश्मीरमधील वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे; त्याचे चटके सहन केले आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. या अनुभवाचा परिणाम त्यांच्या काश्मीर आणि भारत सरकार आणि भारतीय सैन्यदले याबाबतच्या दृष्टिकोनावर होतो. ही मते अनेकांना धक्कादायक वाटतील पण अशी ही मते काश्मीरबाबतच्या खुल्या चर्चेत समाविष्ट असली पाहिजेत. तसे झाले तरच त्यांचा प्रतिवाद करणे किंवा त्यांची दखल घेणे शक्य होईल. काश्मिरीयत किंवा काश्मिरी लोकांचे काश्मिरीत्व या मुद्द्याचा उल्लेख पुस्तकातील अनेक निबंधातून येतो. या काश्मिरीपणाच्या अनेक परी या पुस्तकातूनही उलगडल्या जातात.