97632 06212 pwatsaru@yahoo.com

कोसळलेले सोव्हिएत मॉडेल (5) सोव्हिएत मॉडेलमधील व्यवस्थापक वर्ग


सोव्हिएत मॉडेल चालवणार्या ज्या प्रमुख संस्था होत्या त्यात अग्रदल/कम्युनिस्ट पक्ष हा अर्थात अत्युच्च स्थानावर होता. कारण सर्व महत्त्वाचा आर्थिक धोरणात्मक निर्णय घेताना लागणारे राजकीय मॅन्डेट फक्त त्याच्याजवळच होते. योजना आयोगातील योजनाकार व मंत्रालयातील नोकरशहा यांच्यावर कम्युनिस्ट पक्षातून आलेल्या, मंत्री बनलेल्या राजकीय नेत्यांची प्रत्यक्ष देखरेख असायची. राजकीय धोरणांना प्रत्यक्षात आणणे व राजकीय निर्णयांची अंमलबजावणी हेच योजनाकार व नोकरशहांचे काम असायचे. त्यांना त्या अर्थाने स्वतंत्र अस्तित्वच नव्हते. योजनाकार व नोकरशहांच्या तुलनेत व्यवस्थापकांना मिळणारे स्वातंत्र्य, अंशतः तरी खरे होते असे म्हणता येईल; अंशतः अशासाठी की व्यवस्थापकांना अग्रदलाने घालून दिलेल्या चौकटीतच काम करायला लागायचे म्हणून. व्यवस्थापक राजधानीपासून दूरवर व देशभर पसरलेल्या अनेकानेक उत्पादन केंद्रांमध्ये, कारखान्यांमध्ये विखुरलेला असल्यामुळे अग्रदलाच्या प्रत्यक्ष प्रभावक्षेत्रापासून दूर होता एवढेच त्याचे कारण नव्हते, तर पैसे, कच्चा माल, यंत्रसामग्री व कामगार अशी साधनसामग्री त्यांच्या अखत्यारित असल्यामुळे तो वर्ग संपूर्ण व्यवस्थेत स्वतःचे वजन राखून होता. वरून आदेश जरी आले, तरी कोणते बटन कधी दाबायचे हे पूर्णपणे त्यांच्याच हातात होते. अग्रदल, योजनाकार व नोकरशहा यांनी डोकेफोड करून कितीही चांगल्या योजना बनवल्या तरी या योजनांची परिपूर्ती होण्यासाठी व्यवस्थापक वर्गावरचे त्यांचे अवलंबित्व कायमचे होते. म्हणून व्यवस्थापकांकडे गोळा झालेली वित्तीय ताकद व त्यामुळे त्यांचे वाढलेले वजन यांची तुलना योजनाकार व नोकरशहांशी करता येणार नाही. अनेक दशके सुरू राहिलेल्या सुप्त संघर्षात अग्रदल, योजनाकार, मंत्रालयातील नोकरशहा हे एका गटात तर व्यवस्थापक दुसर्या गटात असायचे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe