97632 06212 pwatsaru@yahoo.com

नेमाडेंनी ज्ञानपीठ मॅनेज केले?


रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातील एक मोठे विचारवंत आहेत. आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे वैचारिक योगदान आहे. शांत स्वभावाचे म्हणूनही रावसाहेब परिचित आहेत. काही वर्षांपूर्वी मी आणि रावसाहेब नागपूरला एका रूममध्ये मुक्कामाला होतो. त्यावेळी सरांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली होती. आता अचानक त्यांनी भालचंद्र नेमाडेंना फैलावर घेतल्याने आश्चर्य वाटले. खरे तर सरांनी नेमाडेंवर ज्या पद्धतीने टीका केली, त्याचे जास्त आश्चर्य वाटते. आता नेमाडेंचा देशीवाद आणि सरांचे त्यावरचे म्हणणे यावर चर्चा होण्याची गरज आहे. मला त्या वादावर जास्त बोलायचे नाही, मात्र सरांनी नेमाडेंना मिळालेल्या ज्ञानपीठावरच आपेक्ष घेतला आहे. नेमाडेंनी ज्ञानपीठ मॅनेज केले, असा गंभीर आरोप सरांनी केला आहे. मला वाटते या आरोपात काही तथ्य नाही. आता या पुरस्कार समितीवर नेमाडेंचे मित्र नामवरसिंह आहेत, ते फक्त नेमाडेंचेच मित्र आहेत, असे नाही तर ते अनेक साहित्यिकांचे मित्र आहेत. चर्चेसाठी आपण गृहीत धरूया की, नामवर हे नेमाडेंचे मित्र आहेत. मात्र केवळ ते मित्र आहेत म्हणून नेमाडेंना हा पुरस्कार मिळाला अशी शंका घेणे हे नेमाडेंवर अन्याय करणारे आहे. मुळात नेमाडे या पुरस्कारासाठी लायक आहेत की नाहीत हा प्रश्न आहे. जर ते लायक असतील तर मग पुरस्कार ठरविणार्या समितीत त्यांचे मित्र होते म्हणूनच त्यांची निवड झाली असा आरोप निराधार आहे. मराठी साहित्यात नेमाडेंचे योगदान कसबेही नाकारत नाहीत. मग नेमाडेंच्या या योगदानाची दखल घेतली असेल तर त्यात वावगे काय आहे, खरे तर ही दखल आधीच घ्यायला पाहिजे होती. याचा दुसरा पैलूही मला महत्त्वाचा वाटतो. रावसाहेब कसबे यांचेही एकूण महाराष्ट्रातील वैचारिक प्रबोधनात मोठे योगदान आहे. मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाच्या समन्वयाच्या अनुषंगाने त्यांनी केलेले लिखाण असेल किंवा आरएसएसचे सरांनी केलेला पर्दाफाश असेल, कसबे यांचे योगदान ऐतिहासिक समजले पाहिजे. त्या तुलनेत राष्ट्रीय पातळीवर कसबे यांंची दखल घेण्यात आली नाही. ज्या जातवर्गात कसब्यांचा जन्म झाला ही एक बाब त्याला कारणीभूत असली पाहिजे. नेमाडेंची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली तशीच कसबे यांची घेतली पाहिजे.