पंतप्रधान बोला, तोंड उघडा! सुषमा स्वराज, व्यावसायिक परीक्षा मंडल, वसुंधराराजे यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात तुम्ही काही तरी सांगा, अशी विनंती नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्ष करीत आहेत. अनेक वृत्तपत्रेही अग्रलेखातून तशी मागणी करून थांबली. पण मोदी काही बोलत नाहीत. ते मौन आहेत. त्यांचे हे मौन खास संघीय आहे. म्हणजे रा. स्व. संघ जसा अनेकदा मौनात गेला तसे हे मौन आहे. राजकीय पेच, तात्त्विक अडचण किंवा नैतिक कर्तव्य म्हणून मोदी गप्प बसलेले नाहीत. त्यांचे मौन एका गर्विष्ठ बहुसंख्याक धर्माचे आहे. आपण प्रचंड आहोत. आडवेतिडवे आहोत. प्रश्न विचारायचा अधिकार कोणी कोणाला दिला? मी थोरला, आधीपासूनचा, इथला आणि म्हणून सनातन असताना मला पृच्छा करण्याची प्राज्ञा कोणाची होऊ शकते? मी हिंदू म्हणून इथला मूळचा आहे. मी आजवर जे करीत आलो, ते बरोबरच होते. टिकलो एवढी हजारो वर्षे म्हणजे जे केले ते योग्यच होते. मग असा मी हिंदू निर्दोष, अचूक, अप्रतिहत असताना स्पष्टीकरण कशास देऊ?