97632 06212 pwatsaru@yahoo.com

एमआयएमची अपरिहार्य प्रगती


अब्दुल कादर मुकादम यांच्या 'वाटसरू' (1 ते 15 सप्टेंबर 2015) मधील लेखाच्या संदर्भात माझे विचार थोडक्यात देत आहे. हैदराबादच्या एमआयएम या पक्षाने महाराष्ट्रातील अलीकडच्या विधानसभा व महापालिका (नांदेड व औरंगाबाद) निवडणुकांमध्ये जे यश मिळवले त्या यशाची दोन कारणे मला उल्लेखनीय वाटली. ('वाटसरू', 16 ते 30 जून 2015.) त्यातील पहिले कारण हे होते की एमआयएमने पक्षात दलितांना सामावून घेतल्याचे दिसत आहे. काही ओबीसी व दलित (हिंदू) पक्षाच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. मुकादम यांच्या दोन्ही (1 मे 2015 च्या 'महाराष्ट्र टाइम्स'मधील व 1 सप्टेंबरच्या 'वाटसरू'मधील) लेखांमध्ये मला या पैलूबाबत उल्लेख किंवा भाष्य आढळले नाही. हा 'पॅटर्न' यापुढे कायम राहणार आहे का किंवा बळावत जाणार आहे का हे काळच ठरवेल. येथे मी एवढे मात्र नमूद करू इच्छितो की हैदराबादच्या विद्यापीठांमधील विद्यार्थी संघटनांत मुस्लिम-दलित जवळीक दिसून येत आहे. उदाहरणादाखल 'द हिंदू' (6 सप्टेंबर 2015) मध्ये हैदराबादेतील विद्यार्थी आंदोलनाचा जो वृत्तान्त प्रकाशित झाला आहे, त्यावरून हे तथ्य दिसून येते. (हे आंदोलन विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये पोलीस स्टेशन्स उभारण्याच्या सरकारी कृतीविरुद्ध आहे.) विद्यार्थ्यांच्या संघटनांपैकी केवळ एकाच संघटनेचे नाव येथे देतो - ते म्हणजे 'दलित आदिवासी बहुजन मुस्लिम स्टुडंट्स असोसिएशन.' ही संघटना तेथील इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे. तेव्हा एमआयएमपुरस्कृत मुस्लिम-दलित एकत्रीकरणाचा प्रयत्न उपेक्षणीय आहे, असे मानता येणार नाही.