97632 06212 pwatsaru@yahoo.com

एफटीआयआय संपाविषयी एक अनावृत्त पत्र


अरुण खोपकर FTII मध्ये सुरू असलेल्या संपाबद्दल लिहिण्याआधी मी माझ्या माफक पात्रतेबद्दल थोडं बोलतो. माझा FTII या संस्थेबरोबरचा 1971 पासून संबंध आहे, प्रथम विद्यार्थी म्हणून, पुढे चाळीस वर्षे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून. त्याशिवाय मी FTII च्या अकॅडमिक काऊन्सिलचा सहा वर्षे आणि तसेच संस्थेची सर्वोच्च संघटना, FTII सोसायटीचा मी तीन वर्षे सदस्य होतो. दिग्दर्शनाच्या अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या पॅनलचाही मी अनेकदा सभासद होतो. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटसंशोधन करणार्या संस्थांशी माझा सिनेविद या नात्याने संबंध आला आहे. माझ्या होमी भाभा फेलोशिपच्या संशोधनाचा विषयही सिनेमा आणि इतर कला यांचा परस्परसंबंध आणि त्याचा सिनेशिक्षणाशी असणारा संबंध हा होता. ह्यासंबंधी मी देशोदेशीच्या संशोधनपत्रिकांत संशोधनविषयक लेखन केले आहे तसेच त्यावर पुस्तकेही लिहिली आहेत. तेव्हा माझ्या दीर्घ विचारांती इथे नोंदलेल्या विचारांचा आपण सहानुभूतीपूर्वक आणि अधीर न होता विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे.