97632 06212 pwatsaru@yahoo.com

आरोग्यसेवेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा अजेंडा हवा!


‘वैद्यकीय क्षेत्रातील दोन महत्त्वाचे प्रश्न’ या छोट्या लेखात आशुतोष दिवाण यांनी कॉर्पोरेट हॉस्पिटलनामक केवळ नफेखोरीसाठी चाललेल्या इस्पितळांमुळे उभे ठाकत असलेल्या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे, हे स्वागतार्ह आहे. छोटी इस्पितळे व रुग्ण या दोघांचे नुकसान करणारी ही कॉर्पोरेट हॉस्पिटल्स विशेषतः मोदी सरकारच्या काळात अधिकाधिक प्रभुत्व गाजवू लागली आहेत. मोदी सरकार ‘अमेरिकन मॉडेल’कडे झुकणारे असल्याने अमेरिकेत विमा कंपन्यांच्या प्रभावामुळे ही कॉर्पोरेट हॉस्पिटल्स जी अनेक गैरकृत्ये करतात तीच ‘परंपरा’ भारतात रुजू लागली आहे. दिवाण यांच्या लेखामुळे त्याबाबत एक इशारा मिळाला आहे. दिवाण यांनी नोंदवले हे की डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांनी केलेल्या चुकांमुळे अमेरिकेत दर वर्षी 44,000 जण दगावतात. खरे तर हे प्रमाण यापेक्षा जास्त आहे. अलीकडे म्हणजे 2013 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार निरनिराळ्या अभ्यासांमध्ये आढळले आहे की दरवर्षी अमेरिकेत इस्पितळात दाखल झालेल्यांपैकी सुमारे 0.6 ते 1.4 टक्के रुग्ण डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांनी केलेल्या चुकांमुळे दगावतात. हे लक्षात घेता डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांनी केलेल्या चुकांमुळे दरवर्षी अमेरिकेत एकूण 2 ते 4 लाख मृत्यू होतात! अमेरिकेत मृत्यू होण्याचे हे तिसर्या क्रमांकाचे कारण आहे! युरोपमध्ये अमेरिकेपेक्षा खूप चांगली आरोग्यव्यवस्था आहे, तिथे हे प्रमाण एवढे नाही. कॉर्पोरेट्स व आरोग्य-विमा कंपन्या यांच्या अभद्र युतीमुळे अमेरिकेत ही स्थिती उद्भवली आहे. मोदी सरकार नेमकी अमेरिकन व्यवस्थेसारखी व्यवस्था आणू पाहत आहे!