97632 06212 pwatsaru@yahoo.com

पर्युषणपर्वातले पाच दिवस


दत्ता भगत 17 ते 21 सप्टेंबर 2015 असा पाच दिवस मी जैन धर्माचे प्रसिद्ध भाष्यकार प्रियकर यशवंत जैन यांच्या सहवासात जयपूर (राजस्थान) येथील सांगानेर मंदिरात वास्तव्याला होतो. सामान्यपणे जैनधर्मीय अभ्यासकांना प्रियकर यशवंत जैन यांची भारतभर ओळख आहे. ते फिरलेही भारतभर आहेत. त्यांच्या नावात ‘प्रिय’ हा शब्द असला तरी सर्वसामान्य पारंपरिक जैन अभ्यासकात मात्र ते फारसे ‘प्रिय’ नाहीत. श्रद्धाळू जैनमंडळीत मात्र ते प्रिय आहेत. श्रद्धाळू जैनांचा समूह फारसा चिकित्सक अभ्यासक नसतो. त्यामुळे सर्वसामान्य भाविक हिंदूधर्मीय ज्याप्रमाणे हिंदू साधूंचा मनापासून आदर व्यक्त करीत असतो तसाच सांसारिक जैनही आपापल्या प्रवचनकारांचा मनापासून आदर करीत असतो. मी डॉ. जैन यांचा मित्र आहे, अगदी सख्या भावाइतकाच प्रिय आहे हे मी जाण्याआधीच तेथील भाविक मंडळींना कळले होते. त्यात मी पाच दिवसांसाठी पर्युषणपर्वात सहभागी होण्यासाठी येतो आहे हे कळल्यामुळे सर्वच भाविक मंडळींनी मी जयपूर स्टेशनवर उतरल्यापासून तो थेट परत निघाल्यानंतर दुर्गापुरा स्टेशनपर्यंत रेल्वेत बसवण्यापर्यंत माझा जो आदरसत्कार केला तो माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय होता. माझी पत्नीही माझ्यासोबत होती. त्यामुळे तेथील महिला भाविकांनीही तिची जी काळजी घेतली तीही शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी होती. ही काळजी घेणारांत जैन मंदिराची उभारणी करणार्या ताराचंद्र यांचा अख्खा परिवार होता. हे ताराचंद्र सांगानेर विभागातले बिल्डर असून अक्षरशः कोट्यधीश आहेत पण तेवढेच विनम्र स्वभावाचेही आहेत.