97632 06212 pwatsaru@yahoo.com

आपरेशन


'आपरेशन तर घेतलंय, पन आता करायचं कसं राव?' असा विचार करत तुकाराम या कुशीवरून त्या कुशीवर वळला. मातीच्या छातीभर उंचीच्या भिंतीवर पानकणसांचं छप्पर टाकून तयार केलेल्या 'सपरात' तो आणि त्याची आई झोपले होते. आईचा डोळा लागला होता. तिच्या घोरण्याचा हलका हलका आवाजही येत होता. शेतातल्या या सपाराला काहीच सोबत नव्हती. तुकाराम आणि त्याची एकटी आई या सपरात राहत होते. भाऊबंदकीच्या वाटण्यामध्ये ही आठ गुंठे आडवळणाची जागा त्याचा वाट्याला आली होती. सगळ्या मोक्याचा जागा चुलत्यांनी पटकावल्या होत्या. तुकारामची आई त्या जागेत मिरच्या, मेथी, कोथिंबीर, दुधी, कारली वगैरे लावून घराचा गाडा ओढत होती. लहानशा त्या सपरामध्ये मोजकंच सामान होतं. एका बारक्या फळीवर चार दोन भांडी होती, एक जुनी संदुक आणि त्यावर वळकटी करून ठेवलेली पांघरूणं हेच या मायलेकाचं विश्व. नाही म्हणता तुकारामच्या कॉलेजला जाण्यामुळं वह्या, पुस्तकं, सिंरीन्जा,