97632 06212 pwatsaru@yahoo.com

कुछ इश्क किया, कुछ काम किया


आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल किंवा कदाचित त्याही आधीची. नेमकं आठवत नाही, पण मी एक सीडी ऐकली होती. इक्बाल बानोच्या गाण्यांची. या गायिकेनं गायलेलं काहीही मी त्याआधी कधीच ऐकलं नव्हतं. सीडीत सात-आठ गाणी असतील किंवा जास्तही असतील, पण त्यातली दोन गाणी मला अजूनही जशीच्या तशी आठवतात. याचं कारण म्हणजे तेव्हा ती सीडी पुढे मागे करून ही दोन गाणी त्या दोन दिवसांत मी किमान पन्नासएक वेळा तरी ऐकली असतील. एका गाण्यात इक्बाल बानो तिच्या खड्या आवाजात ठणकावायची - हम देखेंगे, लाज़ीम है के हम भी देखेंगे, वो दिन के जिस का वादा है... कुठल्या दिवसांचा वादा आहे असा प्रश्न पडेपर्यंत आकाशवाणीचा जो एक काल्पनिक आवाज आपल्या सगळ्यांना माहीत आहे तशा आवाजात ती गर्जायची-