97632 06212 pwatsaru@yahoo.com

कॅम्पसमधील जातीयवाद


रोहित वेमुलाच्या आत्महत्येची घटना झाली त्या दिवशी आयआयटी मुंबईमधील एका विद्यार्थी चळवळीमधील कार्यकर्त्याने असे लिहिले की, “त्याचा देह होस्टेलच्या रूममध्ये लोंबकळत होता. पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा देह सोडून गेला होता.” रोहितची आत्महत्या म्हणजे भारतीय शिक्षणव्यवस्था, राजकारण, समाजकारण या सार्या व्यवस्थांसाठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे. रोहित एक हुशार, बुद्धिमान आणि विचारी मुलगा होता. त्याच्या सभ्य वागणुकीमुळे आणि चांगल्या नेतृत्वगुणामुळे तो सर्वांमध्ये आपली चांगली ओळख ठेवून होता. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा लढा अर्ध्या वाटेवरच सोडून तो निघून गेला आहे. या लढ्यामध्ये त्याच्याविरुद्ध असलेल्या इतर विद्यार्थी चळवळीचे कार्यकर्ते, काही राज्यकर्ते आणि सत्ताधारी पक्षातील पुढारी, मंत्री या सगळ्यांशी लढता लढता हार मानून तो सोडून गेला. या त्याच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ वाटत असतानाच आणखी दुःख या गोष्टीचे होते की, मृत्यूनंतर त्याचे दफन करताना त्याच्या घरच्या व्यक्ती आणि मित्रपरिवाराला कळवण्याची तसदीदेखील पोलिसांनी घेतली नाही.