97632 06212 pwatsaru@yahoo.com

सहज माणसांचा स्वप्नील प्रदेश


दिनकर मनवर समकालीन कवितेतील महत्त्वाचे कवी आहेत. 'अजूनही बरंच काही बाकी' हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या संग्रहातून त्यांची चांगली ओळख मराठी कवितेला झाली आहे. 'रूटस्' या नावाचे कविता आणि चित्रांचे संकलन त्यांच्या नावावर असले तरी तो मर्यादित वितरण स्वरूपातील प्रयोग होता. त्यामुळे त्यांच्या कवितेतील प्रवासात त्याला फारसे महत्त्व नाही. त्या दृष्टीने त्यांचे दोन संग्रहच त्यांनी कल्पिलेला कवितेतील आपला अवकाश समर्थपणे पेलताना दिसतात. तसेही कविता ही एक दृष्टी असते. आपल्या आवाक्यातील जग पाहण्यासाठी निर्मिलेली एक सृष्टी असते. कवितेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यक्त झालेला अनुभव, परंपरा आणि भविष्यकाळ आजच्या वास्तवाद्वारे पुढे ठेवत असतो. आपल्याला प्राप्त झालेल्या भाषेच्या संचितातून योग्य प्रतिमांकन, प्रतीक, आशय आणि संकेताची स्वत:ची मुद्रा निर्माण करीत जातो. त्यातून तयार झालेली ओळख कवितेच्या कार्यक्षमतेच्या बाजूची असते. सर्वमान्य असलेली कर्तृत्वशीलता तिचा आधार असतो. त्या दृष्टीने 'अजूनही बरंच काही बाकी'मधून जे काही बोललं गेलेलं आहे.