97632 06212 pwatsaru@yahoo.com

हिवरे बाजार गावाचा कायापालट


महाराष्ट्रातील अहमदनगर या दुष्काळप्रवण जिल्ह्यातील सुमारे हजारभर लोकांची वस्ती असणारे एक छोटेसे गाव, पाण्याच्या पुरवठ्यासाठी केवळ मोसमी पावसावर निर्भर असणारे. आणि अशा परिस्थितीतसुद्धा आज गावातील सुमारे 226 कुटुंबांपैकी सुमारे 60 कुटुंबे दशलक्षाधीश आहेत! पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत दरिद्री म्हणून ओळख असणार्या या गावाचे रूपांतर सधन गावामध्ये करण्याची किमया त्या गावातील एका उच्चशिक्षण घेतलेल्या तरुणाने केली. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणाने शहरामध्ये चांगली नोकरी मिळवून स्वत:चे जीवन संपन्न करण्याचे आमिष धुडकावून लावून आपले जीवन ग्रामविकासासाठी वेचण्याचा वसा घेतला. आणि त्याच्या अथक प्रयत्नांमुळे बघता बघता या वैराण गावाचे रूपांतर एका सधन आणि संपन्न गावमध्ये झाले. आज सदर गावाचे विकासाचे प्रतिमान एक आदर्श गाव म्हणून वाखाणले जात आहे. देशाच्या कानाकोपर्यातून हजारो लोक या गावाला भेट देऊन हे विकासाचे प्रतिमान जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.