97632 06212 pwatsaru@yahoo.com

वैश्विक जननिष्ठ जाणिवेची लेखिका : महाश्वेतादेवी


अभिजन वर्गात जन्माला येऊन समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचण्याची क्षमता असलेली लेखिका म्हणून महाश्वेतादेवी आगळ्यावेगळ्या ठरतात. त्यांचा जन्म 1926 सालचा. ढाक्का येथे त्या जन्मल्या. वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे वडिलांच्या नोकरीच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना शिक्षण घ्यावे लागले. ढाक्का, मदिनपूर, कोलकाता, शांतिनिकेतन अशा काही ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी एम. ए. इंग्रजी असे पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही काळ प्राध्यापकाची नोकरीही केली. त्यांना ब्रिटिशांची गुलामगिरी, सरंजामशाहीची शोषणाची वृत्ती आणि प्रशासनातील अन्याय लादणारी प्रवृत्ती याबद्दल खूप चीड होती. त्या अस्वस्थतेतून त्यांची संवेदनशीलता, बंडखोर कार्यकर्ती आणि लढाऊ बाण्याची लेखणी यांना एक प्रकारची सर्जक शक्ती प्राप्त झाली. केवळ हस्तिदंती मनोर्यातून आणि आलिशान महालात बसून लेखन करणार्या तथाकथित अभिजनवादी लेखक त्या कधीही नव्हत्या, तर प्रत्यक्ष बंगाल आणि परिसरातल्या वंचितांच्या, आदिवासींच्या वाड्या-पाड्यांपर्यंत जाऊन त्यांनी त्या विदीर्ण जीवनाची अनुभूती घेतली होती.