97632 06212 pwatsaru@yahoo.com

श्रावणबाळाची विरोध भक्ती


नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर करून देशाला वेठीस धरेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्च्यानी सार्वजनिक चर्चाविश्व व्यापून टाकले होते. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर या मोर्च्याच्या मालिकेस सुरुवात झाली. लाखोंची संख्या, मोर्च्यातील शिस्त, तसेच मोर्च्याचे मूक असणे हे चर्चेचे विषय बनले. सर्व सामाजिक चळवळी, अभ्यासक, समाज विभाग आपापल्या भूमिकेतून या मोर्च्यांना समजून घेण्याचा, त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध नियतकालिके त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘वाटसरू’ने मराठा मोर्च्याची सखोल चिकित्सा करणारा अंक प्रकाशित केला आहे हे त्याचेच उदाहरण होय. याच अंकामध्ये श्रावण देवरे यांनी ‘क्रांती मोर्चा की गर्दी मोर्चा’ नावाने लेख लिहिला आहे. प्रस्तुत लेखामध्ये देवरे यांनी प्रामुख्याने कॉ. किशोर ढमाले यांच्या ‘सत्यशोधक जागर’ या मासिकात लिहिलेल्या लेखाची चिकित्सा करण्याचा आव आणत मराठा मोर्च्यांवर टीकास्त्र उगारले आहे. परंतु हे टीकास्त्र चालवताना त्यांनी जातवर्गस्त्रीदास्यअंतक चळवळीत काम करणार्या व्यक्तींवर पातळी सोडून हीन दर्जाची टीका व निंदानालस्ती केली आहे. तसेच इतर गरळही मोठ्या प्रमाणावर ओकली आहे. एरवी त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य परंतु ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो’ या उक्तीनुसार कुणीही सोम्यागोम्याने उठून काहीही लिहावे आणि कित्येक वर्ष जे जातीहितसंबंधाना फाटा देऊन वर्ग संघटनांच्या माध्यमातून जातवर्गस्त्रीदास्यअंतक चळवळीत काम करत आहेत त्यांना बदनाम करायच्या, परत्वे त्या संघटना व चळवळी वर प्रश्न उभे करायच्या प्रवृत्ती निर्माण होण्याचा धोका संभवतो. या संभावित धोक्याला रोखण्याच्या हेतूने त्याचा परामर्श घेणे मला आवश्यक वाटले. म्हणून मी देवरेलिखित स्वमहात्म्य आणि इतरांवरील शेरेबाजीचा परामर्श घेत आहे.