सहा वर्षांपूर्वीची घटना. आम्ही पुण्यातून कोल्हापूरला बिर्हाड हलवायचे ठरवले होते. काही मित्र-मैत्रिणींना घरी बोलवणे-भेटायला जाणे असे कार्यक्रम सुरू होते. विनया म्हणाली, “आपण सुलभाताईंना जेवायला बोलवूया, कोल्हापूरला जाण्यापूर्वी.” मी जरा बावचळलोच. म्हणालो, “अग, त्यांची तब्येत-पथ्यं आणि कामाचा धबडगा यात त्या कशा येतील?” तरीही विनयाचा आग्रह सुरूच राहिला. मी म्हणालो, “मला बोलायला जरा भीड वाटते, तूच बोल ना!” ‘ठिकाय’ असे म्हणून विनया त्यांच्याशी बोलली. त्यांच्याशी बोलून तिने जेवणाचा बेत ठरवला. त्या आल्या. प्रत्येक पदार्थ चवीने खाल्ला. पाककृती विचारली. ‘मी आज खूप जेवले’ म्हणाल्या. भरपेट दोन-तीन तास गप्पा झाल्या. कॉफी विचारल्यावर ‘मी सहसा घेत नाही, पण कर’ म्हणाल्या. कॉफी आणि सुपारीचा आस्वाद घेऊन मग निवांतपणे परतल्या. आम्ही खूप खूश तर होतोच पण दोन दिवस मी स्वतः त्या ‘शॉक’मधून बाहेर आलो नाही. आजही तो प्रसंग आठवला की त्यांच्या भेटीचे समाधान पुन्हा समोर येते. सुलभाताईंबद्दलची आपली जी प्रतिमा आहे, त्यापेक्षा त्या किती वेगळ्या आहेत हे स्पष्ट जाणवले. एवढेच नव्हे तर विशिष्ट कारणे, कामे आणि स्वभाव यामुळे एखाद्या व्यक्तीची आपल्या मनात - आणि बर्याचदा भोवतालच्या वर्तुळात - विशिष्ट प्रतिमा कशी बनते आणि आपण कळत-नकळत त्या व्यक्तीला त्याच प्रतिमेत ढकलून ढकलून बंदिस्त करत जातो की काय असाही प्रश्न मला पडला.