लोकशाहीर संभाजी भगत यांनी लिहिलेले एक गाणे आहे. मला आवडणार्या त्यातील काही ओळी अशा,
भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा
भीम भजनातून बाहेर ये बाबा
नवा विचार घेऊन ये बाबा
नवे हत्यार घेऊन ये बाबा
अगदी खरे सांगायचे तर हा नवा विचार, नवी हत्यारे आपल्याला घडवायची आहेत. हे जर करू शकलो तरच आपण आंबेडकरवादी म्हणवून घेण्यास पात्र ठरतो असे मी मानते. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून जोवर आपण आपल्या आत कठोरपणे डोकावून पाहत नाही, आत्मपरीक्षण करत नाही, तोवर आपणही आज संपूर्ण भारतभरात पसरलेल्या ‘भक्तव्याध’ नावाच्या तीव्र आजाराचे शिकार होऊ की काय, अशी मला साधार भीती वाटते.